Thursday, June 11, 2009

क्रमांक सात

नमस्कार!

बर्‍याच दिवसांनी लिहीण्याचा योग येतोय. खूप दिवस बरंच कायकाय लिहायचं मनात होतं परंतु काहीनाकाही कारणांमुळे ते राहूनच गेलं खरं. असो.

अडमुठेपणा डॉट कॉम मधे काम करीत असतान बाळ्या सर्वात जास्ती मेल्स मलाच पाठवायचा. दररोज सुमारे १०० तरी मेल्स यायच्याच! विविध विषयांवर असलेल्या मेल्स वाचायला खूप मजा यायची. त्याच्या ऑफीसकडून येणार्‍या काही निवडक मेल्स ही तो मला पाठवायचा. वानगीदाखल हीच मेल बघा:

अडमुठेपणा डॉट कॉम्स रिस्क अ‍ॅडव्हायझरी बुलेटीन

Subj:: This Summer Vacation, the Grinch Goes Online!!

*** Be a Prudent Surfer this season! ***

This summer vacation is on & so are many promotional offers on the net. However, when it comes to internet you need to be more vigilent than ever while browsing or shopping online during the vacation, as social engineering sites may impersonate or deceive you to take away your credentials & control of your machine while claiming to offer a good deal. In case you come across any suspicious e-mails or fictitious websites, please report through security incident reports.

एकदा बाळ्याला कोणत्यातरी बँकेकडून असंच एक मेल आलेलं होतं. बाळ्याला शंका आली आणि त्याने संबंधीत लोकांशी संपर्क साधून खात्री करून घेतली आणि एका फ्रॉड मेलचा शोध लावला आणि वाहव्वा मिळवली. Good Show, Balya!! Keep it up my friend!!

असो, आज इतकंच.

रामराम!

Monday, June 1, 2009

क्रमांक सहा

नमस्कार!


बाळू महाराजांचं वाचन तसं बरं आहे. बरं म्हणजे बरच बरं आणि बरच काही वाचतोही! पण डोळे - मेंदू - आणि मेंदू - जीभ ह्या दळणवळणांचे वेग सतत बदलत असल्यामुळे मधलं बरंच काही स्किप करून महाशय पुढे जात रहातात. परवाचीच गोष्ट. आम्ही सगळे मित्र (हो हो फक्त मित्रच. मैत्रिणी वगैरे नाहीत बरं का! अहो, पन्नाशीकडे झुकलेल्या आम्हा सो कॉल्ड गृहस्थाश्रमींच्या सुकलेल्या कंपूत कोणती स्त्री सामील होईल?) गप्पा हाणीत बसलो असता आमचे बाळोबा नेहमीप्रमाणेच 'जे जे "मिसेलेनियस" आपणासी ठावे ते ते सर्वांबरोबर शेअर करावे' ह्या सवयीने एकापाठोपाठ एक (परंतु नेहेमीप्रमाणेच एकाचा दुसर्‍याशी काहीही संबंध नाही) माहिती स्त्रावू लागले. हल्ली कामाच्या ठिकाणी बाळोबांनी 'कागद वाचवा' मोहीम कशी सुरु केली आहे आणि जमतील तेव्हढी ई-मेल्स ते कागदावर छापण्याऐवजी आम्युनी (बाळोबांच्या भाषेत आयुम्नी) पीडीएफ कन्व्हर्टर वापरून पीडीएफ फाईल मधे रूपांतर करून कसे साठवतात वगैरे सांगून झाले. बाळोबांच्या ज्ञानाविषयी, कर्तबगारीविषयी आणि जिथेतिथे मागेमागे रहाण्याच्या सवयीबद्दल त्यांच्या साहेबलोकांना बरंचकाही माहिती असल्यामुळे कारकुनीछाप साधीसुधी कामं सोडली तर सांगण्यासारखं फारसं काही बाळ्याच्या वाट्याला येत नाही. बाळ्याला तांत्रिक ज्ञान शून्य (आणि अधिक काही स्वतःहून शिकावं ही आंतरीक इच्छा + उर्मी + जिद्द + जिज्ञासा ही शून्यच) असल्यामुळे त्यामुळे त्याला फावला वेळही बराच मिळतो. या वेळेचा उपयोग तो स्वतःला जे जे काही नव्यानं समजतं ते ते लगोलग दुसर्‍याला (जास्ती करून ई-मेल द्वारे) सांगून टाकत असतो! परवा बाळ्याने अशीच एक धमाल उडवली. तो जिथे कंत्राटी मजूर म्हणून चिकटला आहे तिथे म्हणे त्याने कसलेतरी 'सर्टिफिकेशन' केले! वर मखलाशी करून 'तुम्ही ओळखून दाखवा पाहू' म्हणून मागेही लागला. आता, बाळ्याचे कोणत्याही प्रकारच्या शिक्षणाशी असलेलं हाडवैर लक्षात घेता आम्हा मित्रांना ही थापच वाटली, त्यामुळे कितीही कल्पनाविलास करूनही 'मटका' ही लागेना! दुसर्‍या दिवशी आम्ही भेटलो तेंव्हा विजयाच्या आनंदाबरोबरच 'कशी जिरवली' असा भाव चेहर्‍यावर ओतप्रोत मिरवत साहेबांनी एक कागद सर्वांसमोर फडकवला! तिथे (अर्थातच इंग्रजीत) लिहीलेलं होतं --


धिस सर्टिफिकेट इज अ‍ॅवॉर्डेड टू
बाळू
फॉर सक्सेसफुली कंप्लीटींग द ट्रेनींग ऑफ
अडमुठेपणा डॉट कॉम्स कोड ऑफ बिझीनेस कंडक्ट अँड एथिक्स.


हे वाचून आमचा ग्रुप हादरला आणि मग आनंदला! चक्क बाळ्याने हे शिक्षण इंग्रजीतून घेउन त्यावरील परीक्षा दिली आणि त्यात तो पास ही झाला, हे बघून आम्ही सर्व हरखलो, मोहरलो, रोमांचित झालो, आनंदलो आणि आनंदातिरेकाने दमूनही गेलो. मग त्या दिवशी आम्हा सर्वांकडून चहा समोसा उकळला बाळोबांनी. त्या कंपनीमधे काम करणार्‍या सर्वांनाच ते ट्रेनिंग घेउन ती परीक्षा उत्तीर्ण होणे अत्यावश्यक करण्यात आलेले होते. आमचा बाळ्या हा असा (मठ्ठ) असल्यामुळे कोणा परोपकारी मोरोपंतांची मदत घेउन हे रावसाहेब ती परीक्षा उत्तीर्ण झाले!


आज इतकंच.


रामराम!

Sunday, May 3, 2009

क्रमांक ५


नमस्कार!

काल संध्याकाळी बाळ बाळू धापा टाकत घरी येउन गेला असा निरोप मिळाला. उभ्याउभ्याच येउन गेल्याचंही कळलं. ग्रंथालयातून नवीन पुस्तक आणलं आहे त्यासंबंधी निवांत सवडीने बोलेन असं सांगून गडी निघून गेलासुद्धा म्हणे! बाळ्याचं हे एक बरं आहे. लायब्ररीत जातो आणि नुकतीच परत आलेली पुस्तकं पाहून त्यातील जे बर्‍यापैकी नवंकोरं असेल (इंग्रजी किंवा मराठी) ते उचलून घेउन येतो आणि मला आणून देतो. इतपत ठीक आहे हो, परंतु गाडी इथेच थांबत नाही. 'तुमीबी वाचा आन आमालाबी वाचून दावा..' प्रमाणे तू आधी वाच आणि त्यातलं नेमकं काय वाचू ते हि सांग अशी रिक्वेस्ट ही असते. बाळ्या चांगला सुशिक्षीत आहे त्यामुळे मराठीइतकं नसलं तरी इंग्रजी वाचू शकतो (समजतं कमीच). एक आहे बरं का, या माझ्या भाबड्या मित्रामुळे मला आत्तापरर्‍यंत चांगलीचांगली पुस्तके वाचायला मिळाली आहेत. बरं, आत्तापुरतं इतकच - बाळूमुळे वाचायला मिळलेल्या पुस्तकांविषयी नंतर लिहीनच.

रामराम.

Saturday, May 2, 2009

क्रमांक ४: बाळ्या

नमस्कार!

बाळू! येस! आमचा हा दोस्त म्हणजे मागे एकदा सांगितल्याप्रमाणे एकदम पुणेरी! तसा डोक्याने यथातथाच असला तरी माणूस अतिशय साधा आणि सज्जन. पुण्यातलाच जन्म आणि एका पेठेत लहानपण आणि शिक्षणही झालेलं. निम्न-मध्यमवर्गीय आई-वडिलांचा हा एकुलता एक मुलगा. शिक्षण, नोकरी, ज्ञान, कुवत, कर्तबगारी सर्वच ठिकाणी सामान्य किंवा अति-सामान्य वकुबाचा. लग्न होउन एक मुलगाही आहे. आवर्जून या प्राण्याबद्दल लिहावं असं खरं तर काहीही नाही, पण तरीही त्याच्याबद्दल वाटणार्‍या आपुलकीपोटी म्हणा किंवा मैत्रीपोटीम्हणा अधुनमधुन लिहीन म्हणतो. असो. आत्ता इतकच.

रामराम.

Friday, May 1, 2009

क्रमांक ३

नमस्कार.

उन्हाळा अगदी झकास पेटलेला आहे. सकाळी १० नंतर घराबाहेर पडणे म्हणजे शिक्षा वाटू लागलेली आहे. दिवसभर गरम झळा खिडकीतून येत रहातात आणि घरातील प्रत्येक वस्तु (घरातील लोकांच्या डोक्यासकट) तापवुन जातात. पुर्वीच्या काळी 'झळणी' नामक एक प्रकार असायचा. बादलीभर पाण्यात कढीलिंबाची पाने घालून उन्हात हे पाणी तापवून त्याने आंघोळ केल्यामुळे त्वचेचे संरक्षण हि होत असे आणि आरोग्यासाठीसुद्धा हे चांगले असायचे. हल्ली बर्‍याच घरातून (विशेषतः बंगल्यांमधून) सौरउर्जेवर चालणारे पाण्याचे हीटर्स असल्यामुळे गरम पाण्याची सोय छान झालेली दिसते आहे.

गमभनची ही देवनागरी टंकनाची प्रणाली खूपच सोपी आहे. इतर नउ भाषांमधूनही शब्द टंकिता येतात.

મી પુણેકર આહે. : गुजराथी
মী পুণেকর আহে : बंगाली

वगैरे!! असो.

आज इतकंच.

रामराम.

Thursday, April 30, 2009

क्रमांक दोन

नमस्कार. खूप दिवस बरंच काही लिहीन (लिहून ठेवीन) असं म्हणत होतो परंतु काहीनाकाहीतरी कारणामुळे ते राहूनच गेलं आणि शेवटी आजचा दिवस उजाडला!

मध्यंतरीच्या काळात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या (अजून निकाल जाहीर व्हायचे आहेत - कोण निवडून येणार आहे ते परमेश्वरच जाणे!) आणि आमचा परममित्र बाळू (हाही आमच्यासारखाच टिपीकल पुणेकर!) याच्याबरोबर गाठीभेटी झाल्यामुळे ब्लॉगसाठी आयताच विषय मिळाला. बाळू हा माझा जिवलग मित्र - अगदी लंगोटीयार म्हणतात ना तसा, शिवाय आळशीपणातसुद्धा आम्हादोघांत लहानपणापासून चढाओढ आणि म्हणून विशेष मैत्री!! बाळ्याबद्दल आणि बाळ्याबरोबर झालेल्या गप्पाष्टकांबद्दलसुद्धा मी इथे लिहीण्याचा विचार करतोय.

ब्लॉगचं नाव 'मुक्त आत्मलेखन' असं ठेवण्यामागे काही विशेष कारण होतं असं नाही... 'स्वैरचिंतन' असं नाव जास्त शोभून दिसलं असतं पण एक तर माझा हा ब्लॉग 'चिंतना' पेक्षा 'स्वैर' ला जास्ती जवळचा असल्यामुळे ते नाव बारगळलं हे खरं. असो... पुढेमागे ब्लॉगचा विस्तार झाल्यास नाव बदलीनसुद्धा.

आज इतकंच.

राम राम.

Thursday, April 9, 2009

स्वतःशीच संवाद -- स्वतःसाठीच...

मुक्त आत्मलेखन असं म्हणून अगदी स्वतःसाठीच स्वतःच्याच मनातले विचार लिहून काढण्यासाठीचा हा लेखनप्रपंच. आत्ता इतकंच. जसं जमेल तसं खूप काही लिहून काढीन म्हणतो! अधूनमधून कुठेकुठे कायकाय वाचत असतो त्या संबंधीसुद्धा लिहीन म्हणतो! असो.