फारा दिवसांनी लिहिण्याचा योग आलेला आहे. खरं तर सांगण्यासारखं खूपच कायकाय आहे. बाळ्याबद्दलसुद्धा आणि इतरही बरंच काही!
बाळ्या सध्या बेकार आहे. आय मीन, दोन वर्षांपेक्षा जास्ती दिवस लोटले... जागतिक मंदीच्या लाटेमध्ये पन्नाशीला टेकलेल्या किंवा पार केलेल्या ज्या स्त्री-पुरुषांच्या नोकर्या गेल्या त्यांत एक बाळू. गेले दोन वर्षं अथक परिश्रम करूनही आजही त्याला एकसुद्धा नोकरी मिळालेली नाही. स्वतःचा एखादा व्यवसाय सुरु करून बघण्याचा त्याचा मानस होता परंतु त्यासाठी लागणारे पैशांचे पाठबळ आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे लागणारी मानसिक इच्छाशक्ती आणि उर्जा त्याच्याकडे अजिबातच नसल्याने कसाबसा दिवस रेटतोय. मित्रांकडून कोणत्याही स्वरूपात मदत स्विकारायची नाही असाही खाक्या असल्याने आम्ही मंडळी इच्छा असूनही काहीही करु शकत नाही आहोत ह्याचंच वाईट वाटतंय.
बाळू ज्या (सु / कु) प्रसिद्ध आय.टी. क्षेत्रात काम करायचा तिथे २ वर्षांची "गॅप" म्हणजे कोण अपराध. त्यातून वयही वाढलेलं. वयपरत्वे उत्साहही उतरणीला लागलेला. अशा परिस्थितीत कोणती कंपनी बाळ्याला नोकरीवर ठेवेल? हे ही दिवस जातील अशा एका (खोट्या) आशेवर बिचारा दिवस काढतोय. बाळ्याला निदान पोटापुरते मिळविण्याइतपत तरी कुठे जमले तरी बरे होईल. बाळ्याला सदिच्छा. बाळू बाळा तुझे कल्याण होवो.