Sunday, May 3, 2009

क्रमांक ५


नमस्कार!

काल संध्याकाळी बाळ बाळू धापा टाकत घरी येउन गेला असा निरोप मिळाला. उभ्याउभ्याच येउन गेल्याचंही कळलं. ग्रंथालयातून नवीन पुस्तक आणलं आहे त्यासंबंधी निवांत सवडीने बोलेन असं सांगून गडी निघून गेलासुद्धा म्हणे! बाळ्याचं हे एक बरं आहे. लायब्ररीत जातो आणि नुकतीच परत आलेली पुस्तकं पाहून त्यातील जे बर्‍यापैकी नवंकोरं असेल (इंग्रजी किंवा मराठी) ते उचलून घेउन येतो आणि मला आणून देतो. इतपत ठीक आहे हो, परंतु गाडी इथेच थांबत नाही. 'तुमीबी वाचा आन आमालाबी वाचून दावा..' प्रमाणे तू आधी वाच आणि त्यातलं नेमकं काय वाचू ते हि सांग अशी रिक्वेस्ट ही असते. बाळ्या चांगला सुशिक्षीत आहे त्यामुळे मराठीइतकं नसलं तरी इंग्रजी वाचू शकतो (समजतं कमीच). एक आहे बरं का, या माझ्या भाबड्या मित्रामुळे मला आत्तापरर्‍यंत चांगलीचांगली पुस्तके वाचायला मिळाली आहेत. बरं, आत्तापुरतं इतकच - बाळूमुळे वाचायला मिळलेल्या पुस्तकांविषयी नंतर लिहीनच.

रामराम.

Saturday, May 2, 2009

क्रमांक ४: बाळ्या

नमस्कार!

बाळू! येस! आमचा हा दोस्त म्हणजे मागे एकदा सांगितल्याप्रमाणे एकदम पुणेरी! तसा डोक्याने यथातथाच असला तरी माणूस अतिशय साधा आणि सज्जन. पुण्यातलाच जन्म आणि एका पेठेत लहानपण आणि शिक्षणही झालेलं. निम्न-मध्यमवर्गीय आई-वडिलांचा हा एकुलता एक मुलगा. शिक्षण, नोकरी, ज्ञान, कुवत, कर्तबगारी सर्वच ठिकाणी सामान्य किंवा अति-सामान्य वकुबाचा. लग्न होउन एक मुलगाही आहे. आवर्जून या प्राण्याबद्दल लिहावं असं खरं तर काहीही नाही, पण तरीही त्याच्याबद्दल वाटणार्‍या आपुलकीपोटी म्हणा किंवा मैत्रीपोटीम्हणा अधुनमधुन लिहीन म्हणतो. असो. आत्ता इतकच.

रामराम.

Friday, May 1, 2009

क्रमांक ३

नमस्कार.

उन्हाळा अगदी झकास पेटलेला आहे. सकाळी १० नंतर घराबाहेर पडणे म्हणजे शिक्षा वाटू लागलेली आहे. दिवसभर गरम झळा खिडकीतून येत रहातात आणि घरातील प्रत्येक वस्तु (घरातील लोकांच्या डोक्यासकट) तापवुन जातात. पुर्वीच्या काळी 'झळणी' नामक एक प्रकार असायचा. बादलीभर पाण्यात कढीलिंबाची पाने घालून उन्हात हे पाणी तापवून त्याने आंघोळ केल्यामुळे त्वचेचे संरक्षण हि होत असे आणि आरोग्यासाठीसुद्धा हे चांगले असायचे. हल्ली बर्‍याच घरातून (विशेषतः बंगल्यांमधून) सौरउर्जेवर चालणारे पाण्याचे हीटर्स असल्यामुळे गरम पाण्याची सोय छान झालेली दिसते आहे.

गमभनची ही देवनागरी टंकनाची प्रणाली खूपच सोपी आहे. इतर नउ भाषांमधूनही शब्द टंकिता येतात.

મી પુણેકર આહે. : गुजराथी
মী পুণেকর আহে : बंगाली

वगैरे!! असो.

आज इतकंच.

रामराम.