नमस्कार!
बाळू महाराजांचं वाचन तसं बरं आहे. बरं म्हणजे बरच बरं आणि बरच काही वाचतोही! पण डोळे - मेंदू - आणि मेंदू - जीभ ह्या दळणवळणांचे वेग सतत बदलत असल्यामुळे मधलं बरंच काही स्किप करून महाशय पुढे जात रहातात. परवाचीच गोष्ट. आम्ही सगळे मित्र (हो हो फक्त मित्रच. मैत्रिणी वगैरे नाहीत बरं का! अहो, पन्नाशीकडे झुकलेल्या आम्हा सो कॉल्ड गृहस्थाश्रमींच्या सुकलेल्या कंपूत कोणती स्त्री सामील होईल?) गप्पा हाणीत बसलो असता आमचे बाळोबा नेहमीप्रमाणेच 'जे जे "मिसेलेनियस" आपणासी ठावे ते ते सर्वांबरोबर शेअर करावे' ह्या सवयीने एकापाठोपाठ एक (परंतु नेहेमीप्रमाणेच एकाचा दुसर्याशी काहीही संबंध नाही) माहिती स्त्रावू लागले. हल्ली कामाच्या ठिकाणी बाळोबांनी 'कागद वाचवा' मोहीम कशी सुरु केली आहे आणि जमतील तेव्हढी ई-मेल्स ते कागदावर छापण्याऐवजी आम्युनी (बाळोबांच्या भाषेत आयुम्नी) पीडीएफ कन्व्हर्टर वापरून पीडीएफ फाईल मधे रूपांतर करून कसे साठवतात वगैरे सांगून झाले. बाळोबांच्या ज्ञानाविषयी, कर्तबगारीविषयी आणि जिथेतिथे मागेमागे रहाण्याच्या सवयीबद्दल त्यांच्या साहेबलोकांना बरंचकाही माहिती असल्यामुळे कारकुनीछाप साधीसुधी कामं सोडली तर सांगण्यासारखं फारसं काही बाळ्याच्या वाट्याला येत नाही. बाळ्याला तांत्रिक ज्ञान शून्य (आणि अधिक काही स्वतःहून शिकावं ही आंतरीक इच्छा + उर्मी + जिद्द + जिज्ञासा ही शून्यच) असल्यामुळे त्यामुळे त्याला फावला वेळही बराच मिळतो. या वेळेचा उपयोग तो स्वतःला जे जे काही नव्यानं समजतं ते ते लगोलग दुसर्याला (जास्ती करून ई-मेल द्वारे) सांगून टाकत असतो! परवा बाळ्याने अशीच एक धमाल उडवली. तो जिथे कंत्राटी मजूर म्हणून चिकटला आहे तिथे म्हणे त्याने कसलेतरी 'सर्टिफिकेशन' केले! वर मखलाशी करून 'तुम्ही ओळखून दाखवा पाहू' म्हणून मागेही लागला. आता, बाळ्याचे कोणत्याही प्रकारच्या शिक्षणाशी असलेलं हाडवैर लक्षात घेता आम्हा मित्रांना ही थापच वाटली, त्यामुळे कितीही कल्पनाविलास करूनही 'मटका' ही लागेना! दुसर्या दिवशी आम्ही भेटलो तेंव्हा विजयाच्या आनंदाबरोबरच 'कशी जिरवली' असा भाव चेहर्यावर ओतप्रोत मिरवत साहेबांनी एक कागद सर्वांसमोर फडकवला! तिथे (अर्थातच इंग्रजीत) लिहीलेलं होतं --
धिस सर्टिफिकेट इज अॅवॉर्डेड टू
बाळू
फॉर सक्सेसफुली कंप्लीटींग द ट्रेनींग ऑफ
अडमुठेपणा डॉट कॉम्स कोड ऑफ बिझीनेस कंडक्ट अँड एथिक्स.
हे वाचून आमचा ग्रुप हादरला आणि मग आनंदला! चक्क बाळ्याने हे शिक्षण इंग्रजीतून घेउन त्यावरील परीक्षा दिली आणि त्यात तो पास ही झाला, हे बघून आम्ही सर्व हरखलो, मोहरलो, रोमांचित झालो, आनंदलो आणि आनंदातिरेकाने दमूनही गेलो. मग त्या दिवशी आम्हा सर्वांकडून चहा समोसा उकळला बाळोबांनी. त्या कंपनीमधे काम करणार्या सर्वांनाच ते ट्रेनिंग घेउन ती परीक्षा उत्तीर्ण होणे अत्यावश्यक करण्यात आलेले होते. आमचा बाळ्या हा असा (मठ्ठ) असल्यामुळे कोणा परोपकारी मोरोपंतांची मदत घेउन हे रावसाहेब ती परीक्षा उत्तीर्ण झाले!
आज इतकंच.
रामराम!
No comments:
Post a Comment